संस्कृतीचा उगम

१ भीमबेटका
सन १९५७. दिल्लीहून निघालेली एक रेल्वे भोपाळच्या दिशेने वेगात निघाली होती. या गाडीचा वेग भोपाळ स्टेशन येण्याआधी थोडा कमी झाला होता.आणि अचानक त्या गाडीतून एका तरुणाने उडी मारली आणि समोर दिसणाऱ्या डोंगराच्या दिशेने धावत सुटला. गाडीतल्या प्रवाशांनी त्याच्याकडे एक तुच्छ नजर टाकली आणि गाडीने पुन्हा वेग घेतला. ही विचित्र गोष्ट करणारा तरुण म्हणजे डॉ.विष्णु श्रीधर वाकणकर अर्थात्  हरिभाऊ वाकणकर. भारतातील सर्वात पुरातन शैलाश्रय (rock shelter) शोधणारे पुरातत्वशास्त्रज्ञ. 

मानवी संस्कृतीचा उगम शोधण्याची धडपड ही अशा अभयासकांकडून अव्याहतपणे सुरू आहे. संस्कृतीचा हा उगम, विकास आणि ऱ्हास शोधण्याचे कुतूहल कालातीत आहे. Indology म्हणजे भारतविद्या/भारतशास्त्र ही विद्याशाखा या कुतूहलाला संशोधनाचा भक्कम आधार देते. या शास्त्रात मुख्यतः प्रागैतिहासिक कालखंड( prehistoric age) ते साधारणपणे १२ वे शतक या कालखंडाचा अभ्यास केला जातो,आणि हा प्राचीन भारत या अभ्यासाच्या केंद्रस्थानी आहे. 

या शाखेच्या आधारे इतिहासाच्या आणि संस्कृतीच्या खुणा अभ्यासणं हे मोठं रंजक काम आहे.

आदिम संस्कृतीच्या पाऊलवाटेने निघालेली ही इतिहासाची शाखा १२ व्या शतकापर्यंत येता येता एका देखण्या राजमार्गाचं रूप धारण करते. इतिहासाच्या या वाटेवरचा हा प्रवास मोठा अद्भुतरम्य आणि विलक्षण अनुभव देणारा आहे.

- विनिता हिरेमठ