केंद्र सरकारचे हिंदूंविरुद्ध ‘रिझर्व्हेशन जिहाद’

विहिंप’चे प्रवीण तोगडिया यांची जहाल टीका उभारणार देशव्यापी सर्वधर्मीय आंदोलन

हिंदूंविरुद्ध ‘रिझर्व्हेशन जिहाद’चा अवलंब करून शिक्षण, नोकरी, व्यापारामध्ये अल्पसंख्याक आणि त्यातही मुस्लिम समाजाचे लांगुलचालन करण्याचे धोरण केंद्र सरकार राबवत असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी सोमवारी केला. सरकारच्या या धोरणाविरोधात सर्वधमीर्यांना एकत्र करून देशव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

संसदेच्या अधिवेशनादरम्यान ओबीसी समाजातील ४.५ टक्के जागांवर मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. धर्माच्या आधारावर कोणालाही आरक्षण देण्याची तरतूद भारतीय राज्य घटनेत कुठेही नसताना केंद सरकारने हा निर्णय घेतला असल्याची टीकाही तोगडिया यांनी केली. देशभर रस्त्यावर उतरुन आंदोलन उभारण्याप्रमाणेच कोर्टातही कायदेशीर लढ्याद्वारे याचा विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

‘ या आरक्षणामुळे सध्या केवळ ओबीसींच्या जागा कमी झाल्या आहेत. मात्र, भविष्यात अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित जागेमध्येही मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजासाठी आरक्षण देण्याचा प्रस्ताव रंगनाथ मिश्र आणि सच्चर कमिटीने ठेवला आहे. खुल्या गटामध्येही मुस्लिमांसाठी १० टक्के जागा ठेवण्यात येणार आहेत. याद्वारे शिक्षण, नोकरी आणि व्यापाराच्या संधी हिंदू समाजाकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे’, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्ला चढविला.

मुसलमान आरक्षण तत्काळ रद्द करावे, रंगनाथ मिश्र आणि सच्चर समितीचे अहवाल फेटाळून लावावे, यासह विविध मागण्यांसाठी विविध धमीर्यांना एकत्र करण्याचे काम परिषदेने सुरू केले आहे. जयपूर, नागपूर या नंतर पुण्यातही विविध धमीर्यांच्या सभेसाठीच तोगडिया आले होते. पुढच्या टप्प्यात कॉलेजवयीन विद्यार्थी आणि महिलांनाही या आंदोलनात सहभागी करून घेणार असल्याचे तोगडिया यांनी स्पष्ट केले. [म. टा. प्रतिनिधी, पुणे 2/1/2012]