रामजन्मभूमी खटल्यामध्ये पुरातत्त्व विभागाचा अहवाल महत्त्वपूर्ण ठरला

दै.लोकमत (06-12-2010 )

‘रामजन्मभूमी खटल्यामध्ये पुरातत्त्व विभागाचा अहवाल महत्त्वपूर्ण ठरला’

पुणे दि. ५ (प्रतिनिधी) : पुरातत्त्व विभागाने वादग्रस्त जागेमध्ये खोदकाम करून दिलेला अहवाल रामजन्मभूमी खटल्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत या खटल्यातील रामजन्मभूमी न्यासाचे वकील अॅड. रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले.हनुमत शक्ती जागरण समिती (पुणे महानगर) यांच्यावतीने ‘श्री रामजन्मभूमी उच्च न्यायालय निकालाचे विश्लेषण व वस्तुस्थिती’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हनुमत शक्ती जागरण समितीचे अध्यक्ष प्रदीप जगताप, ज्येष्ठ विधिज्ञ दादासाहेब बेंद्रे, ह.भ.प. मंगलाताई उपस्थित होते.

आयोध्येतील वादग्रस्त जागा ही प्रभू रामचंद्राचे जन्मस्थान असल्याचा निकाल लखनौ खंडपीठाने दिला त्यामागे न्यायालयाने विचारलेल्या बाबी स्पष्ट करताना अॅड. प्रसाद यांनी सांगितले की, ” न्यायालयाच्या निर्देशानुसार पुरतत्त्व विभागाने तीन महिने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये खोदकाम केले. त्यावेळी तेथे दहाव्या शतकातील मंदिराचे अवशेष आढळून आल्याचा अहवाल पुरतत्तव विभागाने दिला. या खटल्याच्या निकालामध्ये हा अहवाल महत्त्वपूर्ण ठरला. घटनेतील कलम २५ नुसार प्रत्येकाच्या धार्मिक श्रध्देचा आदर करण्यात आला आहे. मंदिर तोडून त्या जागेवर मशिद बांधण्यास इस्लाम धर्मात मान्यता नाही. देशातील करोडो हिदू बांधवांची श्रध्दा आयोध्येतील रामजन्मभूमीशी निगडीत होती याचाही विचार न्यायालयाने केला.”

एक ऑस्ट्रेलियन पाद्री इसवी सन १७६६ मध्ये भारतात आला होता त्यामध्ये त्याने हिदूचे जथे हजारोंच्या संख्येने आयोध्येमध्ये जमत असल्याचे वर्णन त्याच्या ग्रंथामध्ये केले आहे. बाबराने १६ व्या शतकामध्ये बाबरी मशिदीची निर्मिती केली तरीही हिदू आयोध्येला पवित्र स्थान मानत असल्याचे स्पष्ट होते असे प्रसाद यांनी सांगितले.

लखनौ उच्च न्यायालयाच्या निर्णयावर रामाचा जन्म कुठे झाला हे न्यायालय कसे ठरवू शकते असा आक्षेप काही लोकांकडून घेतला जात आहे त्याचा समाचार घेताना ते म्हणाले, प्रभुरामचंद्र आयोध्येत जन्माला आले हे लहान मुलाला शिकवावे लागत नाही तर तो आईच्या पोटातून शिकूनच जन्माला येतो. आयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिर होते हे एकदा स्पष्ट झाल्यानंतर पूर्ण जागा रामजन्मभूमी न्यासास मिळणे अपेक्षित आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये अपिल करण्यात आले आहे. आयोध्येत उभ्या राहत असलेल्या भव्य राममंदिरास मुस्लिमांनीही हातभार लावावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दहशतवाद रोखणे, राममंदिराचे निर्माण करणे, गोहत्याविरोधी कायदा करणे हे आव्हाने असल्याचे हभप मंगलाताई यांनी यावेळी सांगितले. प्रदीप जगताप यांनी प्रास्ताविक केले.

रामजन्मभूमीचे त्रिभाजन, हा मोठा प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा

पुणे – रामजन्मभूमी हा देशातील कोट्यवधी हिंदूंच्या भावनेचा प्रश्‍न असेल तर त्या भावनेचा सन्मान व्हावा आणि ईश्‍वर जर संपत्ती नसेल तर त्याचे विभाजन होऊ नये, या बाबी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्या असतील तर रामजन्मभूमीचे झालेले त्रिभाजन हा एक मोठा प्रश्‍न आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि अयोध्या प्रकरणातील रामलल्ला पक्षकांराचे वकील रविशंकर प्रसाद यांनी येथे व्यक्त केले. पुण्यातील हनुमत शक्ती जागरण समितीतर्फे आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.

प्रसाद म्हणाले, “”अयोध्या प्रकरणात न्यायालयाने अनेक बाबींचा सखोल अभ्यास करून हा निर्णय दिला आहे. हजारो वर्षांपासून देशातील कोट्यवधी हिंदूंच्या भावना ज्या ठिकाणी जुळल्या आहेत, त्या ठिकाणी रामाचा जन्म झाल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. हिंदूंच्या शाश्‍वत चिंतनास या निमित्ताने मान्यता मिळाली आहे. रामजन्मभूमी हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक असून, दहाव्या शतकापासून या ठिकाणी मंदिर असल्याचे पुरावे मिळाले आहेत. भारतीय पुरातत्त्व खात्याने दिलेल्या निष्कर्षास न्यायालयाने मान्यता दिली आहे. याचाच अर्थ बाबरी मशीद बनविण्यापूर्वीपासून त्या ठिकाणी मंदिर अस्तित्वात होते हे न्यायालयाने मान्य केले आहे. अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर देशातील अनेक मुस्लिमांनी ही जागा रामजन्मभूमी असल्याचे मान्य केले आहे; पण मतांचे राजकारण करणाऱ्यांना मात्र हे मान्य नाही. त्यामुळे ते न्यायालयाच्या निर्णयानंतर रामाचा जन्म नेमका कुठे झाला, असे प्रश्‍न विचारत आहेत. हिंदूंच्या विरोधात जर हा निर्णय गेला असता तर त्यांनी भावनेचा प्रश्‍न उपस्थित केला नसता.”

मुळात हा मुद्दा न्यायालयात जावा हे एक विडंबन असून सर्वोच्च न्यायालयातही हिंदूंचा विजय होईल. अयोध्येत रामाचे भव्य मंदिर व्हावे, असे जगातील सर्व हिंदूंची इच्छा असून ते पूर्ण होईलच, अशी आशाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, दादासाहेब बेंद्रे, प्रदीप जगताप, मंगलाताई कांबळे उपस्थित होते.