चिंचवड येथे नारदीय कीर्तन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

chinchvad varg

दि. १९/११/२०१२ रोजी चिंचवड येथे नारदीय कीर्तन प्रशिक्षण वर्गाचे दीप प्रज्वलन करून उदघाटन झाले. कार्यक्रमाची प्रस्तावना ह.भ.प. श्री. विश्वासबुवा कुलकर्णी यांनी केली. विश्वाच्या कल्याणाचा विचार, समाजप्रबोधन यातून साध्य होते. राष्ट्रीय कीर्तनकार तयार व्हावेत, त्यातून समाजप्रबोधन व्हावे यासाठी कीर्तन प्रशिक्षण वर्ग आयोजित केला आहे असे त्यांनी सांगितले.

दुसऱ्यांच्या दोषांची चर्चा नको तर स्वत:चे गुण विकसित करा असे ह.भ.प. श्री. चारुदत्त आफळे यांनी प्रशिक्षणार्थीना सांगितले. प्रत्येकाचे सादरीकरण वेगळे असावे. नक्कल करू नये. वि.हि.प.चे भार्गवरावजी सरपोतदार यांनी सांगितले की, कीर्तनकारांनी ” बोले तैसा चाले ” अशी वृत्ती ठेवावी. परमेश्वर स्वरूपाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे कीर्तन कला होय. नारद मुनी हे त्रिलोकात फिरणारे व इतरांच्या चुका दुरुस्त करणारे होते पण त्यांच्याकडे कळीचा नारद या दृष्टीने पहिले जाते हे चुकीचे आहे. चारित्र्यवान, राष्ट्र भक्त, अध्यात्मिक नागरिक निर्माण करणे हे कीर्तनकारांचे कर्तव्य आहे.

चिंचवड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त श्री.सुरेंद्र देव महाराज यांनी सांगितले की हिंदू धर्म विज्ञाननिष्ठ आहे. किर्तनाचा मुख्य उद्देश समाजप्रबोधन आहे. सर्व धर्माचा आदर परंतु हिंदू धर्माचा प्रचार हा कीर्तनाच्या माध्यमातून व्हावा म्हणून देवस्थानने हा कीर्तन प्रशिक्षण वर्ग आयोजित केला आहे. गाव घडेल तर समाज घडेल आणि समाज घडला तर राष्ट्र घडेल. तसेच वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी आत्मसात करणे हे कीर्तनकारांच्या प्रबोधनातून समाजापर्यंत पोहचविले जावे.

श्री.विजय देशपांडे, श्री.व्ही.के.जाधव, श्री.पांडुरंग फाटक, श्री.घननीळ सोनटक्के व श्री.भास्कर गोडबोले यांनी व्यवस्था पहिली. संयोजक श्री. विश्वासबुवा कुलकर्णी यांनी आभार मानले. ह.भ.प. सौ. मानसीताई जोशी यांनी सूत्र संचालन केले.