पर्व विशेष


समर्थ रामदासस्वामी स्थापित मारुती मंदिर


समर्थ रामदासस्वामी द्वारा स्थापित मारुतीच्या अकरा मंदिरांविषयीची माहिती

उपासनेचे सामर्थ्य आणि सामर्थ्याची उपासना समाजाला नेमकेपणाने पटवून देणाऱ्या समर्थ रामदास स्वामींनी श्रीराम आणि हनुमानाला उपास्य मानून समाज प्रबोधन केले. संघटना बांधायची, तरुणांना बलोपासानेने प्रेरित करुन आणि आपल्या हृदयातला मारुतीराया मूर्तीरूपाने त्यांच्यासमोर उभा करायचा, असे ध्येय समर्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवले. बलोपासना आणि समर्थ संप्रदायाची सुरुवात करताना रामदास स्वामींनी तरुणांसमोर शक्तीचे प्रतीक असलेल्या मारुतीची स्थापना केली. साताऱ्याजवळ असलेल्या जरंडेश्वर इथल्या हनुमंताचे दर्शन घेऊन समर्थांनी आपले कार्य सुरू केले. सातारा, कराड आणि कोल्हापूर परिसरात समर्थांनी हे ११ मारुती स्थापन केले. इ.स. १६४५ ते १६५५ या दहा वर्षांत समर्थांनी या ११ मारुतींची स्थापना केलेली दिसते. एका दिवसात किंवा दोन दिवसांत या सर्व मारुतींचे दर्शन आपण घेऊ शकतो. कुठल्या मारुतीचे दर्शन आधी घ्यावे, कोणाचे नंतर घ्यावे, असे काहीही नाही. या अकरा मारुतींशिवाय समर्थांनी गोदावरी काठी असलेल्या टाकळी, सज्जनगड, शिवथरघळ, मिरज, महाबळेश्वर, वाई, टेंभू, शिरगाव, सिंहगड, तंजावर आणि हिमालयातील प्रसिद्ध असलेल्या बद्रिनाथाच्या मंदिरातसुद्धा मारुतीची स्थापना केलेली आहे. जाणून घेऊया समर्थ स्थापित मारुतीच्या अकरा मंदिरांविषयीची माहिती


चाफळचा दास मारुती
सातारा-कराड रस्त्यावर उंब्रज गावात चिपळूणकडे जाणारा फाटा आहे. इथे उजवीकडे वळले आणि पुढे गेले की, एक रस्ता चाफळला जातो. उंब्रजवरून साधारण ११ कि.मी. अंतरावर चाफळ आहे. इ.स. १६४८ मध्ये अंगापूरच्या डोहात सापडलेल्या राममूर्तीची प्रतिष्ठापना समर्थांनी चाफळ येथे केली. याच राममंदिरासमोर हात जोडलेला दास मारुती आणि मंदिराच्या पाठीमागे प्रताप मारुतीची स्थापना समर्थांनी केली. श्रीरामांसमोर नम्रभावाने हात जोडून उभ्या असलेल्या या मारुतीच्या मूर्तीची उंची सहा फूट एवढी आहे. १९६७ साली कोयनेचा भूकंप झाला, त्यात राममंदिराचे नुकसान झाले. परंतु या मारुती मंदिराला काहीही हानी पोचली नाही, असे सांगितले

भीम मारुती/वीर मारुती
चाफळच्याच श्रीराम मंदिरामागे सुमारे १०० मीटर चालत गेल्यावर रामदास स्वामींनी बांधलेले मारुतीचे मंदिर आणखीन एक मंदिर आहे. मंदिरात असलेली मारुतीची मूर्ती म्हणजे रामदासांनी आपल्या भीमरूपी या स्तोत्रामध्ये वर्णन केल्यासारखीच रौद्र मुद्रेत आहेत. मूर्ती सडपातळ असून पायाखाली दैत्य आहे. दोन भिन्न स्वभावाच्या सुंदर मारुतीच्या मूर्ती चाफळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चाफळ हे समर्थ संप्रदायाचे प्रमुख केंद्र असल्यामुळेच कदाचित समर्थानी इथे दोन मारुतींची स्थापना केली असावी, असे सांगितले जाते

माजगावचा मारुती
चाफळपासून केवळ ३ कि.मी. अंतरावर असलेल्या या मारुतीचे एक वैशिष्ट्य आहे. गावरक्षक पाषाणाच्या स्वरूपात असलेल्या या दगडाला समर्थांनी मारुतीचे रूप दिले. माजगावच्या वेशीवर एक घोड्याच्या आकाराचा दगड होता. गावकऱ्यांनी आग्रह केल्यामुळे समर्थांनी इ.स. १६५० मध्ये याच धोंड्यावर मारुतीची प्रतिमा कोरून घेतली. पाच फूट उंचीची मारुतीची मूर्ती पश्चिम दिशेला चाफळच्या राममंदिराकडे तोंड करून उभी आहे. मंदिराच्या एका भिंतीवर द्रोणागिरी पर्वत घेऊन जाणाऱ्या हनुमंताचे चित्र आहे. चाफळच्या श्रीराम देवस्थानकडेच या मंदिराचे व्यवस्थापन आहे.

शिंगणवाडीचा मारुती
खडीचा मारुती, बालमारुती, चाफळचा तिसरा मारुती, असेही या मारुतीला संबोधनले जाते. चाफळपासून साधारण एक कि.मी. अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे. तिथे जवळच समर्थांची ध्यान करण्याची जागा असलेले रामघळ आहे. याच ठिकाणी इ.स. १६५० मध्ये समर्थांनी छोटीशी सुबक अशी मारुतीची मूर्ती स्थापन केली. जेमतेम चार फूट उंचीच्या उत्तरेकडे तोंड केलेली हनुमानाची मूर्ती आहे. चाफळच्या आधी समर्थांचा मठ इथेच शिंगणवाडीला होता. इथे असलेल्या चिंचेच्या झाडाखाली शिवराय आणि समर्थाची भेट झाल्याचे सांगितले जाते. शिवरायांची तहान भागवण्यासाठी समर्थांनी आपल्या कुबडीने एक दगड उलथवून टाकला आणि त्याखाली असलेला पाण्याचा प्रवाह वाहता झाला. त्यामुळे या ठिकाणाला ‘कुबडीतीर्थ’ असेही म्हटले जाते

उंब्रजचा मारुती
उंब्रज येथे तीन मारुती आहेत. त्यातला एक हा उंब्रजचा मठातील मारुती. या मारुती मंदिराशी आणि उंब्रजशीच काही कथा जोडलेल्या आहेत. समर्थ रामदासांना उंब्रज इथे काही जमीन इनाम म्हणून मिळाली होती. इ. स. १६५० मध्ये समर्थांनी एक मारुती मंदिर बांधले आणि एका मठाची स्थापना केली. या मंदिरातील मारुतीची मूर्ती दोन फूट उंचीची आहे. मूर्तीच्या स्थापनेनंतर १४ दिवस इथे रामदास स्वामींनी कीर्तन गेले, असे सांगितले जाते.

मसूरचा मारुती
उंब्रजपासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या मसूर इथे समर्थांनी मारुतीची स्थापना केली आहे. पाच फूट उंचीची, चुन्यापासून तयार केलेली, पूर्वाभिमुख असलेली ही मारुती मूर्ती खरे तर सर्व ११ मारुतींमध्ये देखणी अशीच आहे. इ.स. १६४६ साली या मंदिराची स्थापना समर्थांनी केली. पायाखाली जंबुमाळी नावाचा राक्षस दाबून धरलेला दिसतो. मूर्तीच्या एका बाजूला शिवराम तर दुसऱ्या बाजूला समर्थांचे चित्र काढलेले आहे. मंदिराचा सभामंडप १३ फूट लांबी-रुंदीचा आहे. सहा दगडी खांबांवर मंदिराचे छत तोलून धरले आहे

शिराळ्याचा मारुती
सांगली जिल्ह्यातील शिराळे गाव नागांसाठी प्रसिद्ध आहे. गावातील एस.टी. स्टँडजवळच हे मारुतीचे मंदिर आहे. अतिशय भव्य अशी मूर्ती असलेले हे मारुती मंदिर खरोखर अतिशय देखणे आहे. इ.स. १६५५ साली समर्थ रामदास स्वामींनी येथे मारुतीची स्थापना केली. सात फूट उंचीची चुन्यात बनवलेली हनुमंताची मूर्ती उत्तराभिमुख आहे. मंदिरसुद्धा उत्तराभिमुखच आहे. मूर्तीच्या डोक्यावर डावी-उजवीकडे झरोके ठेवले आहेत. सूर्योदय आणि सूर्यास्ताला मूर्तीच्या तोंडावर प्रकाश पडतो.

शहापूरचा मारुती
कराड-मसूर रस्त्यावर १५ कि.मी. आणि मसूरपासून ३ कि.मी. अंतरावर शहापूर गावचा फाटा आहे. तेथून एक कि.मी. अंतरावर हे मारुती मंदिर आहे. समर्थानी स्थापिलेल्या ११ मारुतींमध्ये हा मारुती सर्वांत आधी स्थापन केल्याचे समजले जाते. इ.स. १६४५ साली समर्थांनी या मारुतीची स्थापना केली. या मारुतीला ‘चुन्याचा मारुती’ असेही म्हटले जाते. गावाच्या एका टोकाला नदीच्या काठावर मारुतीचे मंदिर आहे. मंदिर आणि मारुतीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. अंदाजे सात फूट उंची असलेली हे मारुतीची मूर्ती काहीशी उग्र दिसते. शहापूर येथे रांजणखिंड आहे. या खिंडीजवळच असलेल्या टेकडीवर समर्थाचे वास्तव्य असायचे, असे म्हटले जाते.

बहे बोरगावचा मारुती
सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यात बहे किंवा बाहे गाव आहे. कराड-कोल्हापूर रस्त्यावर असलेल्या पेठवरून साधारण १२ कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. या ठिकाणी मारुतीरायाचे दर्शन घडेल, अशा आशेने गेलेल्या समर्थाना मारुतीने मूर्तीरूपात दर्शन दिले नाही. त्यामुळे समर्थानी मारुतीरायाचा धावा सुरू केला. त्यांना त्यावेळी पाठीमागे डोहातून त्यांना हाका ऐकू आल्या. समर्थांनी डोहात बुडी मारून तिथून मारुतीची मूर्ती बाहेर काढली आणि त्याची स्थापना या ठिकाणी केली. इ.स. १६५२ मध्ये प्राचीन काळी इथे राममंदिर होते. त्याच्या पुढ्यात शिवलिंग. या राममंदिराच्या पाठीमागे मारुतीची स्थापना केलेली आहे.

मनपाडळेचा मारुती
मनपाडळे आणि पारगाव ही दोन्ही गावे कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगड-ज्योतिबाच्या परिसरात आहेत. या परिसराचे राजकीय महत्त्व लक्षात घेऊन समर्थांनी या ठिकाणी दोन शक्तिकेंद्रे निर्माण केली असावीत, असे सांगितले जाते. कोल्हापूर ते वडगाव वाठार हे अंतर २२ कि.मी. आहे. तर वडगाव वाठारवरून पुढे अंबपमार्गे मनपाडळे हे अंतर १४ कि.मी. आहे. ११ मारुतींपैकी सर्वात दक्षिणेकडे असलेल्या या मारुतीची स्थापना समर्थांनी इ.स.१६५२ मध्ये केली. अंदाजे पाच फूट उंचीची साधी सुबक अशी मारुतीची मूर्ती आणि मंदिर दोन्हीही उत्तराभिमुख आहेत.

पारगावचा मारुती
या मारुतीला बालमारुती किंवा समर्थाच्या झोळीतील मारुती, असे म्हटले जाते. कराड-कोल्हापूर रस्त्यावर वाठार गाव आहे. इथून वारणा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवे पारगाव आहे. इ.स. १६५३ साली स्थापना केलेला हा मारुती, ११ मारुतींपैकी सर्वांत शेवटी स्थापलेला आणि सर्वांत लहान मूर्ती असलेला आहे. या मंदिरातील मूर्ती साधारण दीड फूट उंचीची आहे. मनपाडळे ते पारगाव हे अंतर फक्त पाच कि.मी. असले, तरी वळसा घेऊन इथे यावे लागते.


लेखांकन – विवेक वसंतराव सोनक , विश्व हिंदू परिषद
प्रांत प्रचार प्रमुख , पश्चिम महाराष्ट्र प्रांत