व्यर्थ न हो बलिदान … !
– मुकुंदकाका जाटदेवळेकर
सोनियाचा दिवस आजि अमृते पाहिला। नाम आठविता रूपी प्रकट पै झाला॥
खरोखर आज कित्ती आनंद होतो म्हणून सांगू. मनातील आनंद प्रकट करणेच अशक्य. मरेपर्यंत ही आनंदाची बातमी कानावर येईल की नाही ही शंका होती. नव्हे नव्हे! बाहेरचे सगळे विरोधी वातावरण पहाता येणारच नाही हा निश्चय होत होता. पण देवाच्या मनात वेगळेच होते. खूप ढग आलेले असावेत, गडद अंधार पडलेला असावा, स्वच्छ सूर्यप्रकाशाची आवश्यकता व अपेक्षा असावी, तो पडणारच नाही असा निश्चय व्हावा… आणि … आणि अचानक कांही क्षणांकरिता सोसाट्याचा वारा यावा आणि अचानक ढग विरळ व्हावेत… दिशा मोकळ्या व्हाव्यात, आणि सूर्यनारायणाच्या शुद्ध बिंबाच्या सोनेरी प्रकाशात संपूर्ण पृथ्वी न्हाऊन निघावी. अचानक दुर्दिनाचे रूपांतर सुदिनात व्हावे. अगदी … अगदी असेच घडले. गेल्या ५०० वर्षांपासून अनेक परधर्मीय व परधर्मधार्जिण्यांनी घनदाट ढगांच्या रूपाने येवून धर्माचा अखंड प्रकाश देणाऱ्या श्रीरामलला रूपी रविकुलभूषण सूर्याला झाकून टाकले होते. अनेकांनी तेव्हापासून अनेक प्रकारे स्वतःच्या क्षमतेनुसार निर्माण करता येईल अशा वायुवेगाने या धर्मनाशक दुर्मेघांना हटविण्याचा प्रयत्न केला. परंतु, या ५०० वर्षात ४ लाखापेक्षाही अधिक बळी या कार्याकरिता गेले. प्रत्येक हिंदूच्या मनात जे व्हावे अशी इच्छा होती, त्यापेक्षा कमी लोकांची कार्याप्रति निष्ठा होती. पण त्यापेक्षाही कमी लोक इच्छा, निष्ठा व धैर्य यांच्या सम्यक् ऐक्यामुळे बलिदानापर्यंतची मजल मारू शकले. त्या त्या वेळी कधी अपयश, कधी आंशिक यश, तर कधी बरेच यश अशा पायऱ्या त्या त्या काळातील धर्मयोद्ध्यांना गाठता आल्या. पण अंतिम यशापर्यत कुणालाही पोहोचता आले नव्हते. मग त्या-त्या वेळी त्यांची त्यांची बलिदाने व्यर्थ गेली का? तर याचे उत्तर नाही असे आहे.
याचे चिंतन दोन प्रकारे करता येईल; एकतर देव, देश अन् धर्मासाठी बलिदान करणारा प्रत्येक वीर मनात मला याच कार्याकरिता परत जन्माला यायचे आहे या निश्चयानेच मैदानात उतरलेला असतो. किंवा, दुसरे म्हणजे ज्या कार्याकरिता हे बलिदान दिले जाते ते काम कुणीतरी पुढच्यांनी केले पाहिजे ही अंतिम प्रबळ इच्छा त्या बलिदानीची असते. ती इच्छा हजारोपटीने होऊन सकारात्मक लहरींच्या रूपाने आसमंतात वावरत असते. या दोन्ही गोष्टींचा विचार करता आतापर्यत या कार्याकरिता बळी गेलेले ४ लाख वीर, त्यांच्या अंतिम इच्छेच्या परिपाकातून ज्या एका विभूतिमत्वामध्ये एकरूपाने एकवटले आहेत ते विभूतिमत्व म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून ताऊन सुलाखून निघालेले, संघातील पूर्वीपासून आतापर्यंतच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते सर्व सरसंघचालकांपर्यत प्रत्येकांच्या अन्तःकरणात असलेल्या देव, देश, धर्म निष्ठेचा स्फुंज व त्याकरिता त्यांच्याकडून पदोपदी घडलेल्या अमाप पुण्याचा पुंज या रूपात प्रकट झालेले, तसेच या देशातील मुनीमहर्षी रूप असलेल्या सर्व धर्माचार्यांनी धर्मस्थापनेकरिता आचरिलेल्या सर्व तपाचे मूर्तिमंत रूप असलेले, किंबहुना … अतिशयोक्ती वाटेल पण कलियुगातील वर्तमानातील लोकांना धर्माचरणाकरिता व्यवस्थितपणे मोकळीक मिळेल अशी व्यवस्था ज्या रामललाच्या स्थापनेने होणार आहे त्याची स्थापना आपले सर्व काही पणाला लावून करणारे आधुनिक श्रीराम म्हणजे आपले विद्यमान पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आहेत यात कोणतीही शंका नाही.
व्यक्तिगत विचार करता आम्ही स्वतःला खूप भागयवान समजतो. कारण ४० वर्षांपूर्वी राष्ट्रसंत आचार्य स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांचा परिचय झाला. परिचयाचे रूपांतर प्रेमात व प्रेमाचे रुपांतर अभिन्नह्दयतेत झाले. यातूनच पुढे संघाचा व संघकार्याचा परिचय झाला आणि १९९२ साली रामजन्मभूमी मंदिर निर्माणाकरिता होणाऱ्या आंदोलनाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातून अयोध्येला गेलेल्या १० हजार भाविकांसमवेत झालेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व करण्याचा लाभ मिळाला. तिथे पू. रामचंद्रदासजी महाराज व पू. अशोकजी सिंघल या रामकार्याने प्रेरित झालेल्या व अनेकांच्या मनात निष्ठेचा अग्नी चेतविणाऱ्या धगधगत्या निष्ठा ज्वालेचा सहवास लाभला. खरोखर मनातल्या आतल्या कप्यात झाकून व जपून ठेवलेले ते अयोध्येच्या मातीत यापित केलेले ते क्षण आहेत. असो. लिहावे खूप वाटते पण दिलेली मर्यादा पाळणे क्रमप्राप्त ठरते.
शेवटी एकच सांगेन, आज आपल्याला मिळालेला जो सोन्याचा दिवस आहे तो खूप कष्टाने मिळाला आहे. या दिवसाचा सूर्यास्त होणार नाही असे सर्व हिंदूंकडून वागले गेले तरच पूर्वीच्या बलिदानांचे चीज झाले, अन्यथा नाही. याकरिता आपल्या शास्त्राने सांगितल्यानुसार व आपल्या कुवतीनुसार काटेकोरपणे धर्माचे पालन केले गेले तर घराघरात हे धर्म रूप राममंदिर निर्माण होईल व आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील हा सोन्याचा दिवस चंद्र-सूर्य असेपर्यंत मावळणार नाही. प्रत्येकाच्या जीवनात हे होवो ही माझ्या माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो व लेखणीला विराम देतो.
शेष भगवत्कृपा! इति।